कच्चिथीवू बेटावर श्रीलंकेचा पुन्हा दावा

हिंदुस्थान आणि श्रीलंकेदरम्यान कच्चिथीवू बेटाचा वाद पुन्हा उफाळला आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या विधानसभेत कच्चिथीवू बेट एकमताने परत मिळवण्याचा ठराव मंजूर झाला. कच्चिथीवू बेट पुन्हा ताब्यात घ्यावे आणि मच्छिमारांचे संरक्षण करावे, अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेकदा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी कोणत्याही बाहेरील दबावाला झुकणार नाही, असे वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर दिसनायके यांनी अचानक कच्चिथीवू बेटाचा दौराही काढला. ‘पूर्वीची सरकारे युद्धाची शक्यता लक्षात घेऊन कामे करायची, आताच्या सरकारचा प्रयत्न असेल की देशात कोणत्याही प्रकारचे युद्ध होऊ नये. देशात शांती राहो,’ असे सूचक वक्तव्य दिसनायके यांनी केले. कच्चाथीवू हे 285 एकरमध्ये पसरलेले बेट आहे.