श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आणखी एक धक्का, अंडर 19 विश्वचषकाच्या यजमान पदावरून हकालपट्टी

श्रीलंकेच्या क्रिकेट नियामक मंडळासोबत सध्या एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू आहे. श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक स्पर्धेतही विशेष कामगिरी न दाखवल्याने बाहेर पडावं लागलं. आता त्यात आणखी एका संकटाची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आता श्रीलंकेकडून अंडर 19 विश्वचषकाचं यजमानपद काढून घेण्यात आलं आहे.

श्रीलंका क्रिकेट नियामक मंडळात सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आयसीसीने एका प्रदीर्घ बैठकीनंतर ही धुरा आता दक्षिण आफ्रिकेवर सोपवण्याचा निर्णय घेतला. 19 वर्षांखालील विश्वचषक पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे. तत्पूर्वी श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी 2023च्या विश्वचषकातील वाईट खेळीमुळे संपूर्ण नियामक मंडळाला बरखास्त केलं होतं. आयसीसीने हा सरकारी हस्तक्षेप मानला आणि श्रीलंका मंडळाचं निलंबन केलं होतं. आता आयसीसीकडून श्रीलंकेला दुसरा धक्का मानला जात आहे.