नशिब असावं तर असं! घरात खोदकाम करताना सापडला 750 कोटींचा निलम

म्हणतात ना नशिब बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट एका व्यक्तीसाठी तंतोतंत खरी ठरली आहे. या व्यक्तीला घरात खोदकाम करताना तब्बल 7.5 अरब रुपयांचा (750 कोटी) निलम सापडला.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील एका व्यापाऱ्याने घरात विहिर खोदण्याचे ठरवले. खोदकाम करताना त्याला 510 किलो वजनाचा निलम सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या निलमची किंमत 743 कोटी 78 लाख रुपये आहे. सध्या हा निलम कोलंबोतील एका बँकेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला असून या निलमसाठी विदेशातून बोली लावली जात असल्याचे श्रीलंकेच्या राष्ट्रीय रत्न आणि आभूषण प्राधिकरणाने (एनजीजेए) सांगितले.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रत्नपुरा शहरात निलम दगड आढळला आहे. या भागात बहुमुल्य दगड सापडतात म्हणून या शहराला जेम सिटी असेही म्हटले जाते.

या निलम दगडाचे मालक डॉ. गमागे यांनी सांगितले की, घरात विहिरीचे खोदकाम करताना मजुरांना हा निलम सापडला. यानंतर हा दगड बाहेर काढण्यात आला. या दगडाला सेरेंडिपीटी सैफायर असे नाव देण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच 25 लाख कॅरेटचा हा निलम स्वच्छ करण्यासाठी एक वर्षाचा काळ लागेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, हा एक विशेष निलम असून कदाजित जगातील सर्वात मोठा निलम असण्याची शक्यता आहे. हा निलम 100 सेमी लांब, 72 सेमी रुंद आणि 50 सेमी रुंद असल्याचे एनजीजेएच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या