मुथय्या मुरलीधरन यांच्यावर ऑन्जिओप्लास्टी

श्रीलंकेचे क्रिकेट विश्वातील महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांची शनिवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रविवारी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयात ब्लॉकेज असल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. मुथय्या मुरलीधरन हे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.

मुथय्या मुरलीधरन यांना सोमवारी चेन्नईतील अपोलो रुग्णालयातून सोडण्यात आले. अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. जी. सेनगोटुवेलु यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर यशस्वी कोरोनरी अँजिओप्लास्टी झाली आहे. 2015 मध्ये मुथय्या मुरलीधरन हे सनरायझर्स हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनले. त्यांच्या कार्यकाळातच 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. याचबरोबर तामीळनाडू प्रीमियर लीगच्या दुसऱया पर्वात मुथय्या मुरलीधरन हे थिरुवल्लुर वीरन्स संघाचे प्रशिक्षक होते. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवात निराशाजनक झालेली आहे. लागोपाठच्या तीन पराभवांमुळे हा संघ गुणतालिकेत रसातळाला आहे.

800 कसोटी बळी टिपणारे एकमेव गोलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 बळी टिपण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचे महान फिरकी गोलंदाज असलेल्या मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्येही 534 गडी बाद केले आहेत. याचबरोबर 12 टी-20 सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना मुथय्या मुरलीधरन यांनी 13 फलंदाज बाद केलेले आहेत. आयपीएलमध्ये मुथय्या मुरलीधरन यांनी 2008 ते 2014 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांनी आयपीएलमध्ये 66 सामन्यांत 6.68च्या सरासरीने 63 गडी बाद केलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या