
पाकिस्तान सुपर लीगला (PSL) मोठा धक्का बसला असून श्रीलंकेचा टी-२० कर्णधार दसून शनाकाने पीएसएल सोडून IPL मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शनाका पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचा भाग होता, मात्र आता तो राजस्थान रॉयल्स संघात सामील होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सने दुखापतग्रस्त सॅम करनच्या जागी शनाकाशी संपर्क साधला असून, श्रीलंकेच्या या अष्टपैलू खेळाडूने आयपीएलसाठी होकार दर्शवला आहे. यापूर्वी झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझरबानी आणि वेस्ट इंडिजचा गुडाकेश मोती यांनीही पीएसएलपेक्षा आयपीएलला पहिली पसंती दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) यंदा आयपीएलच्या काळातच पीएसएल आयोजित करण्याची रणनीती आखली होती. आयपीएल सुरू असूनही विदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध राहतील, असा पीसीबीचा अंदाज होता. मात्र, जसजशी आयपीएलमध्ये संधी मिळत आहे, तसतसे खेळाडू पीएसएल सोडून हिंदुस्थानात धाव घेत आहेत. २०२६ च्या आयपीएल लिलावात शनाकाला कोणीही खरेदी केले नव्हते, त्यामुळे तो लाहोर कलंदर्सकडून ७५ लाख पाकिस्तानी रुपयांत खेळण्यास तयार झाला होता. मात्र, आता राजस्थान रॉयल्सची ऑफर मिळताच त्याने पीएसएलमधून माघार घेतली आहे.
अस्तित्वाची नवी ओळख! अनाया बांगरचा धाडसी निर्णय; वडिलांच्या पाठिंब्याचं जगभरातून कौतुक
खेळाडूंच्या या सततच्या निर्गमनामुळे पीसीबी आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. पीएसएलचा करार अर्धवट सोडून आयपीएलला जाणाऱ्या खेळाडूंवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बंदी घालू शकते. यापूर्वी २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सशी जोडल्या गेलेल्या कॉर्बिन बॉशवर पीसीबीने एक वर्षाची बंदी घातली होती. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनीही रविवारी माध्यमांशी बोलताना संकेत दिले की, जे खेळाडू अटी आणि कराराचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.























































