श्री त्र्यंबकेश्वर मंदिर शुक्रवारपासून दर्शनासाठी खुले

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आठ दिवसांपासून सुरू असलेले संवर्धनाचे काम आता पूर्ण झाले आहे. मंदिर उद्या, १३ जानेवारीपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुले होणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याने पिंडीवर वज्रलेप केला असून, गाभार्‍यास चांदीचे दरवाजेही बसवले आहेत.

संवर्धन व देखभालीच्या कामासाठी हे मंदिर ५ जानेवारीपासून आठ दिवसांसाठी दर्शनाकरीता बंद ठेवण्यात आले होते. येथे आज गुरुवारपर्यंत पुरातत्व खात्याने संवर्धन काम पूर्ण केले आहे. झीज होत असलेल्या पिंडीवर वज्रलेप करण्यात आला असून, संभाजीनगर येथील उद्योजक शेखर देसरडा यांनी दिलेले चांदीचे दरवाजे गाभार्‍याला बसविले आहेत. सभामंडपातील दर्शन रांगेचे लोखंडी कठडे काढून त्याजागी स्टेनलेस स्टीलचे कठडे लावण्यात आले आहेत.

ही विकासकामे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी व विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाखाली आणि पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत. संबंधित काम पूर्ण झाल्याने उद्या शुक्रवारी, १३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आता दररोज हर्ष महालाचे दर्शन

मंदिराच्या सभामंडपातील हर्ष महालाचे सौंदर्यीकरण व नूतनीकरण झाले आहे. दररोज रात्री शयन आरती झाल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वर या महालात येतात, अशी परंपरा आहे. हा महाल सिसम व सागवानी लाकडावरील अप्रतिम कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. हा महाल आधी वर्षातून केवळ तीनवेळा भाविकांना दर्शनासाठी खुला असायचा, तो आता दररोज खुला असणार आहे.