श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणाऱया अतिरेक्यांना कश्मीर, केरळात ट्रेनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलंबो

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणाऱया अतिरेक्यांनी कश्मीर, केरळचा दौरा केला असून त्यांना तिथेच घातपाताचे ट्रेनिंग देण्यात आल्याचा गौप्यस्फोट श्रीलंकन लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल महेश सेनानायक यांनी केला आहे.

श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी लागोपाठ झालेल्या आठ बॉम्बस्फोटांत 290 ठार तर 500 पेक्षा जास्त जखमी झाले होते. ‘इसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. स्थानिक दहशतवादी संघटनेच्या मदतीने ‘इसिस’ने हा घातपात घडवून आणला. शनिवारी यासंदर्भात अधिक माहिती देताना श्रीलंकेचे लष्करप्रमुख महेश सेनानायक यांनी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱया अतिरेक्यांनी कश्मीर, केरळचा दौरा केल्याचे तपासात समोर आले आहे. हा दौरा घातपाताचे ट्रेनिंग घेण्यासाठीच होता असा दावाही त्यांनी केला.

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय तपासयंत्रणेने केलेल्या छापेमारीतही 2017 मध्ये दोन आत्मघाती हल्लेखोर हिंदुस्थानात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र हिंदुस्थान सरकारने यावर कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. श्रीलंकेने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, असेही एका अधिकाऱयाने सांगितले. नॅशनल तौहिद जमातचा म्होरक्या मौलवी जहरान बिन हाशिम हा हिंदुस्थानात अनेक दिवस मुक्कामी होता. तो कुणाच्या संपर्कात होता याचा तपशील देण्यास या अधिकाऱयाने नकार दिला.