
कोरोनानंतर मागील दोन वर्षांत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लिखाण क्षमतेवर परिणाम झाला असून परीक्षेची वेळ 10 मिनिटांऐवजी किमान अर्धा तास वाढवून देण्यात यावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळेआधी अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याची अट जाचक असून याचा सारासार विचार करून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच दहावी, बारावीची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित होत आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लेखी पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर आकलनाकरिता प्रश्नपत्रिका देण्यात येत असे, परंतु कॉपी होण्याच्या नावाखाली सदर वेळ यंदाच्या परीक्षेपासून रद्द करून उत्तर लिहिण्यास नियमित वेळेपेक्षा दहा मिनिटे अधिक देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. ऑनलाइन शाळेमुळे लिखाणाची सवय कमी झालेल्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी किमान अर्धा तास वाढवून देण्यात यावा अशी मागणी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
– पेपरफुटीच्या नावाखाली परीक्षेपूर्वीची दहा मिनिटे न देण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले. परीक्षा केंद्रावर प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांची तपासणी होते. मोबाईल अथवा गाइड्स, इतर लिखित साहित्य नसल्याची खात्री केली जाते. त्यामुळे मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याला जबाबदार कोण याची शहानिशा करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱया सुविधांवर निर्बंध घालण्याऐवजी पेपरफुटीला जबाबदार व्यक्तीचा शोध घेणे आवश्यक असल्याचे युवासेनेने या निवेदनात स्पष्ट केले.































































