एसएससी बोर्डाच्या विभागीय अध्यक्षाला लाच घेताना पकडले, भांडारप्रमुखही एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्र्यांच्या अर्थखात्यातील लाचखोर अधिकाऱ्यावर एसीबीने खारघर येथे झडप घातल्याची घटना ताजी असतानाच आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे याला 20 हजारांची लाच घेताना केबिनमध्येच रंगेहाथ पकडले. मंडळाचा भांडारप्रमुख मनोहर पवार यालाही अटक केली असून दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. विद्युत कामाच्या देखभाल दुरुस्तीचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. शिक्षण मंडळातील वर्ग 1 अधिकाऱ्यालाच लाच घेताना अटक केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या नवी मुंबईच्या कार्यालयातील विद्युत उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्याचे कंत्राट घेतले होते. त्याचे बिल टॅक्स इन्व्हॉइससह मंजुरीकरिता अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्याकडे पाठवले होते. ते मंजूर करण्यासाठी भांडारप्रमुख मनोहर पवार याच्यामार्फत लाच मागितली होती.

सापळा रचून कारवाई

आज दुपारी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून पैसे स्वीकारताना राजेंद्र अहिरे याला पकडले. त्याच्यासह मनोहर पवार यालाही अटक केली असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.