
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱया दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइनरीत्या घेण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच केली. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विद्यार्थीवर्गाकडून विरोध करण्यात आला असून बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्याकरिता विद्यार्थीवर्ग थेट रस्त्यावर उतरला. याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे. तर अंतर्गत मूल्यांकनाचा पर्यायाचाही विचार करावा, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक जिह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱया परीक्षेदरम्यान लॉकडाऊनमुळे आम्हाला घरातून बाहेर पडणे शक्य होणार नाही. परिणामी परीक्षा देता येणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तर आम्हाला अधिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे परीक्षा ऑनलाइनच घेण्यात यावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांकडून रविवारी मांडण्यात आली आहे.
ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यात आला, प्रिलियम्स ऑनलाइन घेण्यात आल्या, महाविद्यालय स्तरावरील परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. मग आमच्या परीक्षा ऑनलाइन का घेण्यात येत नाहीत, असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
काही विद्यार्थी हे गावी असल्याने त्यांना परीक्षा देण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांत यावे लागेल. हॉस्टेलमध्ये राहणाऱया विद्यार्थ्यांची गैरसोय होईल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवास करणे हे धोकादायक आहे. त्यामुळे होमसेंटरचा विचार करावा, अशी मागणीही अनेकांनी यावेळी केली.
नीट, जेईईची तयारी कधी करायची
कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली गेल्यास गतवर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेकांना नीट, जेईईची परीक्षा द्यायची असते. बारावीची परीक्षा विलंबाने झाल्यास त्याचा परिणाम या परीक्षांच्या तयारीवर होईल, अशी भीतीसुद्धा वर्तवण्यात येत आहे.





























































