तोंडी परीक्षा होणार? SSC बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापनावर पुनर्विचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यायची की नाही यावर विचार करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 25 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीतील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत शाळा आणि ज्युनियर कॉलेजमधील तज्ञ शिक्षकांचा समावेश आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याबरोबरच यंदा मूल्यमापन पद्धतही बदलली. विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर यावी यासाठी तोंडी परीक्षा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. युवासेनेने शिक्षण विभागाच्या या निर्णयावर सडकून टीका केली. तसेच शिक्षकवर्गातही या निर्णयाविरोधात नाराजी होती. या निर्णयामुळे यंदाचा दहावीचा निकाल तब्बल 12 टक्क्यांनी घसरला. कमी टक्केवारी एसएससी बोर्डाचे विद्यार्थी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावी प्रवेशात मागे पडले. यामुळे राज्य सरकारविरोधात विद्यार्थी-पालकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशात नामांकित कॉलेजमध्ये वाढीव जागा देण्याचा तसेच प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आता उशीरा शहाणपण सुचलेल्या शिक्षण विभागाने सीबीएसई, आयसीएसई बोर्डामध्ये अंतर्गत मूल्यमापन सुरू असताना एसएससी बोर्डाने रद्द केलेला अंतर्गत मूल्यमापनाच्या (तोंडी परीक्षा) निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती 2019-20 पासून इयत्ता नववी ते बारावीची विषय रचना व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल येत्या दहा दिवसांत सादर होणे अपेक्षित आहे.