
मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल 17 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. वेबसाइटवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येतील तसेच सदर माहितीची प्रिंट घेता येईल.
या वेबसाईट वर पाहा निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in
www.mahahsscboard.in
गुणपडताळणीसाठी 20 जूनपासून अर्ज करता येणार
अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात मिळालेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी 20 ते 29 जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी 20 जून ते 9 जुलैपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सर्व विषयांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱया पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.


































































