
सर्व सामान्यांना लोकलची दारे बंद असल्याने बेस्टच्या मदतीला एसटीच्या लाल परीला नुकतेच घेण्यात आले होते. मुंबईतील गर्दीच्या मार्गावर एसटी बेसेस बेस्टने चालविल्याने बेस्टच्या प्रवासी संख्येत लागलीच वाढ झाली आहे. बेस्टच्या मार्गावर धावणाऱ्य़ा एसटीमुळे बेस्टची प्रवासी संख्या 18 लाख 73 हजारापर्यंत पोहचली आहे.
बेस्टची रोजची प्रवासी संख्या 21 सप्टेंबरपर्यंत 16 लाखांपर्यंत पोहचली होती. बेस्टच्या बसेसना होणारी गर्दी पाहून अखेर 24 सप्टेंबरपासून बेस्टमध्ये एसटी बसेसच्या गाड्या भाड्यावर घेण्याचा निर्णय झाला. सप्टेंबरअखेरीस बेस्टच्या ताफ्यात 100 एसटी गाड्या दाखल झाल्या. सध्याच्या बेस्टमध्ये 480 एसटी गाड्या विविध बेस्ट मार्गांवर धावत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीची जादा कुमक दाखल होण्याआधी बेस्टची प्रवासी संख्या 17 लाख 73 हजार होती. परंतु हीच संख्या 18 लाख 73 हजारापर्यंत गेली आहे. बेस्टच्या मदतीला एकूण 1000 एसटी गाड्या मिळणार आहेत. त्यामुळे आणखी 520 गाड्या मिळणार आहेत. या एसटी गाड्या दर किलोमीटर मागे 75 रूपये भाड्याने महामंडळाने दिल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला इंधन, देखभाल, चालक व वाहकाचा खर्च बेस्ट उपक्रमाकडून तसेच पालिकेकडून दिला जाणार आहे.
बेस्टला एसटीचा आधार
अनलॉक 5 ची घोषणा झाल्यावर मुंबई हळूहळू पूर्वपदाकर येत असताना जे मुंबईकर अत्यावश्यक सेवेत मोडत नाही अशा मुंबईकरांची बेस्टमधून प्रवास करताना तारांबळ उडत असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बस या बेस्ट बसमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहे, जेणेकरून मुंबईकरांची कामावर जाताना होणारी धांदल थांबले.


























































