
सध्या सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत अत्यावश्यक सेवा देणाऱया एसटी महामंडळातील 36 हजार कर्मचाऱयांना कोविड लसीचा पहिला डोस मिळाला आहे. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये एसटी कर्मचाऱयांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
एसटी महामंडळाचे राज्यभरात सुमारे 98 हजार कर्मचारी आहेत. त्यात 34 हजार वाहक तर 38 हजार चालकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या देशव्यापी टाळेबंदीने सर्व प्रकारची वाहतूक बंद पडली असता एसटीच्या कर्मचाऱयांनी अत्यावश्यक सेवेअंतर्गत मजुरांच्या पाठवणुकीसह अत्यावश्यक कर्मचाऱयांची वाहतूक केली. मुंबईत लोकल बंद असताना एसटीने बेस्टच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या पहिल्या लाटेत सेवा बजावली. आताही बेस्टला भाडेतत्त्वावर एसटीच्या बसेस पुरविण्यात आल्या असून एसटी मुंबईत अत्यावश्यक सेवा देत आहे. यामुळे एसटीच्या कर्मचाऱयांना कोरोना संसर्गाचा सामना करावा लागला. गेल्या दीड वर्षात एसटीच्या आठ हजारांहून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली. यात 261 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला, तर 7,215 कर्मचारी उपचारानंतर संपूर्णपणे बरे होऊन घरी परतले.

























































