
एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात ताबा सुटून दुचाकी एसटीखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव शुभम सुधीर पाटील (25) असे असून तो चिपळूण तालुक्यातील पेढे इथला रहिवाशी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरुख एसटी डेपोचे चालक समीर चंद्रकांत बने हे आपल्या ताब्यातील साखरपा-विरार अर्नाळा ही बस घेऊन विरारकडे चालले होते. रात्रीच्या सुमारास त्यांची गाडी नातूनगर येथे आली असता मागून दुचाकीवरून येणाऱ्या शुभम सुधीर पाटील यांने त्यांच्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शुभम याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीला एसटीची धडक बसली आणि शुभम हा दुचाकीसह बसखाली चिरडला गेला. या अपघातात गंभीर दुखापत झालेल्या शुंभम याचा जागीच मृत्यू झाला.

























































