एसटी महामंडळ अखेर आज श्वेतपत्रिका काढणार, ‘लालपरी’ला सावरण्याची धडपड

आर्थिक संकटात चाक रुतलेल्या ‘लाल परी’ला सावरण्याची धडपड महायुती सरकारने सुरु ठेवली आहे. कामगारांच्या थकीत देणी, कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ अखेर सोमवारी आपल्या आर्थिक कामकाजाजी श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे. एसटीचे उत्पन्न, कामगारांची थकीत देणी तसेच इंधन खरेदीसह विविध बाबींवर येणारा खर्च याचा लेखाजोखा यातून समोर येणार आहे.

महायुती सरकारच्या काळात एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. कामगारांच्या थकीत देणींबरोबर कर्जाचा डोंगर महामंडळाच्या डोक्यावर आहे. या आर्थिक संकटात कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार देतानाही महामंडळाची दमछाक होत आहे. यामागील सरकारच्या अपयशावर टीकेची झोड उठली. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एसटी महामंडळ सोमवारी, 23 जून रोजी दुपारी आपल्या आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे.

एसटी महामंडळाला सध्या 10 हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकांचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी कसरत करावी लागत आहे.