कोपरगावात मालेगावच्या एसटी बसचालकाला मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरातील निवारा भागात राहणाऱ्या मनिंदर सिंग बहादूरसिंग भाटियासह सहा जणांनी एसटीमध्ये चढून चालक नितीन यांना शिवीगाळ करीत बुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील सरकारी कपडे फाडले.आमच्या मित्राच्या वाहनाला ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून त्यांनी एसटी चालकाला मारहाण केली. या प्रकरणी मनिंदर सिंग भाटिया याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर इतर पाच जण फरार आहेत. ही घटना कोपरगावातील बस आगारात  घडली आहे. नितीन भिका शिरसाट(39  रा.आसताने, ता.मालेगाव ) असे मारहाण झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे.

नितीन  हा बसचालक पुण्याहून नगर मार्गे मालेगावच्या  दिशेने गुरुवारी रात्री 9 वाजेच्या  सुमाराला जात असताना एसटी बस कोपरगाव आगार येथे आली. बसस्थानकात प्रवासी उतरत असताना मनिंदर सिंग बहादूर सिंग भाटिया, पप्पू खाटीक  व एवढ्या उर्फ अक्षय तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी व्यक्तीनी एसटी चालक नितीन याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून  शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली ,अंगावरील सरकारी कपडे फाडले, या घटनेने भयभीत झालेल्या नितीन शिरसाट यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मनिंदर सिंग भाटियासह सहा जणांविरुद्ध  तक्रार दाखल केली. अटक केलेल्या मनिंदर भाटिया याला शुक्रवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.