
शहरातील बस स्थानकात उभ्या एसटी बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. सुभाष शिवलिंग तेलोरे (वय 42, रा. कोल्हार कोल्हूबाई, ता. पाथर्डी, जि. नगर) असे मृत चालकाचे नाव आहे.
सुभाष तेलोरे हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचे एक बंधू नगर येथील बस डेपोत अधिकारीपदावर आहेत. घरी चांगली शेती असून, दोन मुले, पत्नी आणि आई असा परिवार आहे. सोमवारी (दि. 20) ते नियमितप्रमाणे कामावर हजर झाले होते. पाथर्डी ते नाशिक असा त्यांचा प्रवास असल्याने त्यांनी काल ‘एमएच-14, बीटी-4887’ ही बस आपल्या ताब्यात घेतली व रूटवर निघाले होते. रात्री त्यांची बस संगमनेर स्थानकात येऊन थांबली होती. त्यांनी काही काळ तेथे आराम केला. त्यांच्यासोबत असणारे वाहकदेखील गाडीत मागच्या सीटवर झोपले होते.
वाहक प्रातःविधीसाठी बाहेर गेला असता, तेलोरे यांनी गाडीतील नळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. वाहक परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, तेलोरे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्यात ‘माझ्या मृत्यूनंतर शासनाकडून जी काही रक्कम मिळेल, ती माझ्या घरच्यांना द्या. मी ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले आहेत, ते त्यांना देऊन टाकतील,’ असे म्हटले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
सावकारांच्या कर्जाला कंटाळून उचलले पाऊल!
तेलोरे यांनी पाथर्डी तालुक्यातील लोकांकडून काही लाख रुपये उसने घेतले होते. त्यांना वायदे करून करून ते पैसे ते देऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्याकडून वारंवार होणारा त्रास आणि पैसे घेऊनदेखील ते परत देऊ शकत नाही, याची खंत त्यांना होती. त्यामुळे तेलोरे हे प्रचंड तणावाखाली होते, अशी माहिती समजली आहे.



























































