
राज्य सरकारच्या अनेक सवलतीच्या निर्णयाची प्रतिपूर्ती न झाल्याने तसेच निश्चित धोरण न आखल्याने एसटी महामंडळ तोटय़ात आहे. महामंडळाला सरकारकडून सहा हजार कोटींचे येणे आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता इत्यादी देयके अनेक वर्षे प्रलंबित आहेत. ती वेळेत दिली नाहीत तर महाराष्ट्र एसटी कामगार सेना राज्यभर ‘माझी एसटी, माझा महाराष्ट्र’ आंदोलन करून चक्का जाम करेल, अशी घोषणा शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी केली.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी खासदार अरविंद सावंत यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे कार्याध्यक्ष प्रदीप धुरुंधर आणि सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेले आणि सेवानिवृत्त झालेले ऍड. लक्ष्मण विशे, राजाभाऊ करंगुटकर, हेमचंद्र गुप्ते, प्रसाद मोरे, वासुदेव जाधव, राजन पाटील, सुधाकर घायवटे, बाळासाहेब राणे, नारायण उतेकर, नारायण निलवे यांचा सत्कार करण्यात आला.


























































