
एसटीचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर अशी ओळख असलेल्या चालक-वाहकांसह महामंडळात कार्यरत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना लवकरच नवाकोरा गणवेश मिळणार आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून कर्मचाऱ्यांना तयार गणवेश दिले जात होते. मात्र आता महामंडळाने वर्षाला दोन जोडी गणवेशासाठी लागणारे कापड आणि पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कापड खरेदीसाठी महामंडळाने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जुना गणवेश घालून काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळात 65 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी कर्तव्यावर असताना आपल्या कामाच्या स्वरूपानुसार खाकी किंवा जांभळय़ा रंगाचा गणवेश घालणे बंधनकारक आहे. मात्र एसटीची आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने कामगारांना गणवेश देण्यास विलंब झाला आहे. तसेच एसटी कामगारांनी आपल्याला तयार गणवेश नको, तर कापड देण्याची मागणी केली होती. सदरची मागणी राज्य सरकारने मान्य केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांना दोन जोडी गणवेशासाठी कापड आणि एका गणवेशाच्या शिलाईसाठी 250 रुपयांप्रमाणे 500 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.