
एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या मोकळ्या जागांवर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी इंडियन ऑईल कंपनीशी करार केला आहे. या सामंजस्य करारानूसार राज्यात 30 ठिकाणांवर पेट्रोल, डिझेल इंधनांची विक्री करण्यात येणार आहे. तर पाच ठिकाणांवर एल.एन.जी. इंधनाची सर्व सामान्यांसाठी विक्री केंद्रे सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी झालेल्या कराराच्या बैठकीत दिली. हे पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचलन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी वाहतूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एसटीने नुकत्याच सुरू केलेल्या मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनस्र्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल, एल.एन.जी. (लिक्वीफाईड नॅचरल गॅस)पंप उभारले जाणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल, असे यावेळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
























































