
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी महामंडळाने ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये भरारी घेतली आहे. दिवाळीत एसटी महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला प्रवाशांनी विक्रमी प्रतिसाद दिला आणि एसटीच्या तिजोरीत तब्बल 21 कोटी 44 लाख रुपयांचा महसूल जमा झाला. आर्थिक तोट्यातून वाटचाल करीत असलेल्या एसटीने तिकीट विक्रीसाठी निवडलेला ‘ऑनलाईन’ पर्याय आश्वासक पाऊल मानले जात आहे.
दिवाळी सुट्टीत अनेक जण कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जातात. त्या प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या बस गाडय़ांचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्याला पसंती दिली. त्यामुळे यंदा महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. महामंडळाला पहिल्यांदाच ऑनलाईन तिकीट विक्रीच्या माध्यमातून 21 कोटी 44 लाख 13 हजार 191 रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला. 17 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन बुकिंगद्वारे एसटीच्या 4 लाख 41 हजार 474 तिकिटांची विक्री झाली. ऑनलाईन तिकीट विक्री प्रणाली अधिक जलद व सुरक्षित असल्याने या माध्यमातून कोटय़वधी प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ
4 कोटी 77 लाख 59 हजार 446 रुपये अधिक महसूल.
81 हजार 493 इतक्या अधिक तिकिटांची विक्री.
1 लाख 4 हजार 116 इतकी अधिक आसने आरक्षित.























































