
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ एस.टी. आगाराने बंद केलेल्या वस्तीच्या चार गाड्यांबाबत सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत आगारप्रमुखांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी उशिरा ठाण मांडले. या गाड्या सुरू करीत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांना यावेळी देण्यात आला. अखेर एस.टी.प्रशासनाने नमते घेत चारही गाड्या पूर्ववत सुरू करण्याची तात्काळ कार्यवाही केली.
मराठा आरक्षण मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज क्रांती मोर्चाने पुकारलेल्या जिल्हा बंद दरम्यान कुडाळ तालुक्यातील हिर्लोक व कुसगांव येथे एस.टी.च्या वस्तीला गेलेल्या चार गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड झाली होती. याची एस.टी प्रशासनाने गंभीर दखल घेत या वस्तीच्या चारही गाड्या बंद केल्या होत्या. एस. टी. च्या वरीष्ठ कार्यालयाकडून असा आदेश असल्याचे आगारप्रशासनाकडून सांगितले जात होते. या गाड्या बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय निर्माण झाली. याबाबत कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक व सभापती राजन जाधव यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेही लक्ष वेधले होते. शिवसेनेचे जि. प. सदस्य नागेंद्र परब व अमरसेन सावंत यांनीही एस. टी. प्रशासनासह खा. विनायक राऊत, आ. नाईक यांच्याशी चर्चा केली.
हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे आदींसह ग्रामस्थांनी एस.टी. आगारावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. तसेच मंगळवारी कुडाळ येथे पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत या एस.टी बंदच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सर्वांनी आक्रमक पवित्रा घेत रात्री कुडाळ आगारावर धडक देत आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांना धारेवर धरत जाब विचारला. एस.टी. बंद बाबतचे लेखी आदेश दाखवा, तसेच झालेल्या गैरसोईला एस.टी प्रशासन जबाबदार असून तात्काळ गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी आग्रही मागणी लावून धरली. जोपर्यंत गाड्या सुरू होत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाऊ देणार नसल्याचा इशारा आगारप्रमुखांना देण्यात आला. अखेर आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत चारही गाड्या पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. दोन गाड्या तात्काळ सोडण्यात आल्या. उर्वरित गाड्या बुधवार पासून सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मराठा क्रांती मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अॅड.सुहास सावंत, चंद्रकांत साईल, जि.प.सदस्य नागेंद्र परब, धीरज परब, दादा साईल, रत्नाकर जोशी, प्रसाद गावडे, बाबल गावडे, आनंद भोगले, दिपक गावडे, शैलेश घोगळे, संग्राम सावंत, प्रसाद पाताडे, सुनील सावंत, शैलेश घाटकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आगारप्रमुख डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता चारही गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
































































