
एसटी प्रशासनाने लागू केलेली स्वेच्छा निवृत्ती योजना कर्मचाऱयांना लाभदायक नसल्याने 90 दिवसाऐवजी 180 दिवसांचा लाभ देण्यात यावा, मिळणारी सर्व रक्कम एकरकमी देण्यात यावी, तसेच स्वेच्छा निवृत्ती योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी एसटी कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाने परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांची भेट घेऊन केली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. एसटी कर्मचाऱयांच्या नियमित वेतनासाठी एसटी महामंडळाला इतिहास प्रथमच कोणत्याही प्रतिपूर्ती शिवाय 1000 कोटींचे आर्थिक पॅकेज दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी आभार मानले.
व्हीआरएस घेणाऱयांच्या मुलांना नोकरीत घ्यावे
एसटी कर्मचाऱयांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे सक्त ताकीद देऊन निकाली काढावेत तसेच स्वेच्छा निवृत्ती स्विकारणाऱया कर्मचाऱयांच्या पाल्यांना महामंडळामध्ये नियुक्ती कशा प्रकारे देण्यात येइल याबाबत प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी यावेळी शिष्ठमंडळाला दिले.
यावेळी एसटी कामगार सेनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उतेकर, महिला संघटक स्मिता पत्की, कार्यालय प्रमुख रविंद्र चिपळूण सह कोषाध्यक्ष प्रमोद मिस्त्री उपस्थित होते



























































