
कोविड-19 च्या महामारीचे संकट ओढावल्याने यंदा गणेशभक्तांना आपल्या मित्र परिवार आणि नातेवाईकांसोबत एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरे करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी गणरायाच्या ऑनलाइन दर्शनावर समाधान मानले. अशातच सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने ‘ई-गणेश श्री गणेश’ सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करून गणेश भक्तांना वेगळी अनुभूती दिली. कॉलेजच्या या उत्सवात घरातूनच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन दिमाखदार सोहळा साजरा केला.
सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा ‘ई गणेश, श्री गणेश’ हा पाचदिवसीय सोहळा 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान रंगला. यादरम्यान रोज एक नवीन उपक्रम राबविण्यात आला. मराठी वाङ्मय मंडळाच्या विद्यार्थ्यांनी ’काम भारी’ या पर्यावरणप्रेमी गणेशमूर्ती साकारणाऱया संस्थेचे अभय पांचाळ यांची मुलाखत घेऊन पर्यावरणपूरक उत्सवाची माहिती सांगणारा व्हिडीओ प्रकाशित केला. सणांचे सांस्कृतिक, पारंपरिक आणि शास्त्रोक्त महत्त्व अगदी सोप्या शब्दांत सर्वांपर्यंत माहितीपर व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. गणपती बाप्पाचे महात्म्य, आरतींचे अर्थ आणि बाप्पाला मोदक नक्की का आवडतात यावरचे व्हिडीयोही रिलीज करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उत्सवात सर्वांना सामावून घेण्यासाठी मखर सजावटीची व गौरी पूजनाची छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन करून मंडळाच्या इंस्टाग्राम व फेसबुक पेजवर त्यांना प्रसिद्धी देण्यात आली. या उपक्रमाला कॉलेजमधील आणि बाहेरील मंडळींनी सुद्धा भरघोस प्रतिसाद दिला. एवढेच नाही, लाईव्ह आरतीचा आनंद सर्वांनी घेतला.


























































