हिंदुस्थानचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीची शतकी किक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरीना येथे इतिहास रचला जाणार आहे. हिंदुस्थानचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्री मुंबईत खेळवण्यात येणाऱया हीरो इंटरकॉण्टिनेण्टल चौरंगी फुटबॉल स्पर्धेत १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. सुनील छेत्री याने आतापर्यंत ९७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून आगामी स्पर्धेतील तीन लढतींमध्ये सहभागी झाल्यास  तो शंभरी पूर्ण करील.. याआधी बायचुंग भुतियाने हिंदुस्थानसाठी सर्वाधिक १०४ सामने खेळण्याचा मान संपादन केला आहे.

सुनील छेत्री २००५ साली जून महिन्यात पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. एएफसी चॅलेंज कपच्या फायनलमध्ये त्याने तझिकिस्तानविरुद्धच्या लढतीत पहिली हॅटट्रिक नोंदवली. या लढतीत हिंदुस्थानने प्रतिस्पर्ध्याला ४-१ अशा फरकाने हरवले. सुनील छेत्रीने किर्गीस्तानविरुद्ध गोल करीत इंग्लंडच्या वेन रुनीच्या ५३ आंतरराष्ट्रीय गोलना लीलया मागे टाकले. आतापर्यंत सुनील छेत्रीने हिंदुस्थानासाठी ५६ गोल केले आहेत.

सेलिब्रेशन नंतरच…

हिंदुस्थानचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेण्टाईन यांनी सुनील छेत्रीच्या शतकी सामन्यांचे सेलिब्रेशन स्पर्धेच्या मध्यावर करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. जेणेकरून हिंदुस्थानी संघातील खेळाडूंचे स्पर्धेतील लढतींवरचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण स्पर्धेनंतर स्पेशल सेलिब्रेशन करता येऊ शकेल असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रोनाल्डो, मेस्सीनंतर…

सध्या खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱयांच्या यादीत सुनील छेत्री अव्वल पाचमध्ये आहे. ख्रिस्तीयानो रोनाल्डोने पोर्तुगालसाठी ८१ गोल केले असून लियोनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी ६१ गोल केले आहेत. डेव्हिड विलाने स्पेनसाठी ५९ आणि क्लिंट डेम्पसीने अमेरिकेसाठी ५७ गोल केले आहेत. सुनील छेत्रीने हिंदुस्थानसाठी आतापर्यंत ५६ गोल केले असून १ जूनपासून सुरू होणाऱया हीरो चौरंगी कपमध्ये गोलची संख्या वाढेल हे निश्चित आहे.