
सामना प्रतिनिधी । मुंबई
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या शिक्षकांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच या मागण्या लवकर पूर्ण केल्या नाहीत तर आत्महत्येचा इशाराही दिला आहे, परंतु सरकारने त्यांची मागणी गांभीर्याने घेतलेली नाही. ही बाब विरोधकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच याप्रकरणी बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणीही केली. विरोधकांची ही सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मान्य केली. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांनी आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केल्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सभागृहाला सांगितले. पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू असून या संघटनेच्या पदाधिकार्यांना बोलावून अर्थमंत्र्यांसोबत त्यांच्या दालनात बैठक घेण्यात यावी अशी मागणी काळे यांनी एका सूचनेद्वारे केली. यावर ही सूचना आपण मान्य करत असल्याचे सभापतींनी सभागृहाला सांगितले.



























































