संघात माझे नाव बघितले व मला अश्रू अनावर झाले, सुर्यकुमार यादवची भावुक प्रतिक्रीया

आयपीएल गाजवल्यानंतरही सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे तो खूप नाराज झाला होता. मात्र आता बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या टी-20 संघात त्याची निवड केली आहे. त्याच्या या निवडीवर सुर्यकुमार यादवने भावुक प्रतिक्रीया दिली आहे. ‘संघात माझे नाव बघून मला अश्रू अनावर झाले’, अशी प्रतिक्रीया सुर्यकुमारने बीसीसीआयशी बोलताना दिली आहे.

‘संघ निवडीच्या दिवशी मी एकटाच खोलीत बसून चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र लक्ष सर्व निवड समितीच्या बैठकीकडे होते. तेवढ्यात मोबाईलवर एक नोटिफिकेशन आले व त्यात माझी संघात निवड झाल्याचे लिहलेले होते. ते वाचून मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. मी माझ्या आई वडिलांना, बायकोला व बहिणीला व्हिडीओ कॉल केला. आम्ही सर्व एकत्र रडत होतो’ असे बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत सुर्यकुमारने सांगितले.

‘देशासाठी खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझ्यासोबत माझे कुटुंबीय देखील ते स्वप्न बघत होते. ते माझ्या प्रत्येक सुखदुखात माझ्यासोबत उभे होते. त्यामुळे या बातमीनंतर त्यांना खूश बघून माझ्या डोळ्यातही आनंदाश्रू आले’, असे सुर्यकुमार याने सांगितले.

‘विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे आता विराटकडून जास्तीत जास्त शिकून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्यामुळे मी देखील एक चांगला खेळाडू बनू शकेन. मी आयपीएलमध्ये त्याच्याविरोधात खेळलो आहे. त्याची जिंकण्याची भूक ही वेगळी आहे. त्याच्याकडून बरंच काही शिकता येईल’, अशा शब्दात सुर्यकुमारने त्याची उत्सुकता व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या