राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान

प्रातिनिधिक फोटो

कोरोनासंदर्भात निर्बंध जाहीर केल्यानंतर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना अखेर राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात सात लाख पंधरा हजार परवानाधारक रिक्षा असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपयेप्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेण्यात आली असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात सात लाख पंधरा हजार परवानाधारक रिक्षा असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपयेप्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

याकरिता परिवहन विभागामार्फत ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यात परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाइन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यात ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तत्काळ जोडणी करून घ्यावे. जेणेकरून या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल, असे आवाहन परिवहन मंत्री ऍड. परब यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या