राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांचाही सदस्यपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलने, प्रति आंदोलने सुरू असताना दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी प्रा. डॉ. संजीव सोनवणे आणि बालाजी किल्लारीकर यांनीदेखील आयोगाच्या सदस्यपदाचे राजीनामे दिले आहेत. एकापाठोपाठ एक तीन सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे आयोगाचे कामकाज, सर्वेक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाला सादर करावयाच्या सर्वेक्षण अहवालाला विलंब होणार की, अहवाल सादर होणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रा. लक्ष्मण हाके यांनी आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामापत्र पाठवले असून त्यामध्ये वैचारिक मतभेदामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. राजीनाम्याची प्रत त्यांनी मुख्यमंत्र्यांनादेखील पाठवली आहे. मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असताना राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असून आतापर्यंत तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

बालाजी किल्लारीकर यांनी आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देताना महाराष्ट्रात संपूर्ण जातीय जनगणना झाली पाहिजे. त्यामध्ये जी काही आकडेवारी येईल त्याचा तुलनात्मक अभ्यास करून प्रश्न सोडवला पाहिजे. मराठा आरक्षण या नावाने आरक्षण दिले नाही तरी ईडब्ल्यूएससारखा विशिष्ट वर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल, अशी माझी भूमिका होती. पण शासनाच्या आणि माझ्या भूमिकेत फरक पडत होता. त्यामुळे मी नाराजीने राजीनामा दिला, असे स्पष्ट केले होते. राजीनामा दिलेले प्रा. डॉ. संजीव सोनावणे आणि बालाजी किल्लारीकर या दोन सदस्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. मात्र, हे दोन्ही राजीनामे अद्याप स्वीकारले गेले आहेत किंवा नाही याबद्दल आयोग अथवा शासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.