
निवडणूक रोख्यांचा तपशील ही खासगी माहिती आहे, तसेच हा प्रश्न विश्वासार्हतेचा आहे, असे सांगत भारतीय स्टेट बँकेने माहिती अधिकारांतर्गत निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला आहे. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही बँकेने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि आयोगाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ती जाहीर केली. मात्र, हीच माहिती आरटीआयअंतर्गत देण्यास एसबीआयने नकार दिला. माहिती अधिकार कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी 13 मार्च रोजी एसबीआयकडे अर्ज करून निवडणूक रोख्यांचा तपशील मागितला होता.
काय उत्तर दिले एसबीआयने?
तुम्ही मागितलेल्या माहितीमध्ये खरेदीदार आणि राजकीय पक्षांचे तपशील यांचा समावेश आहे. त्यामुळे ही माहिती उघड केली जाऊ शकत नाही. कारण, तो विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, असे उत्तर एसबीआयच्या उपमहाव्यवस्थापकांनी दिले. त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या सवलतींशी संबंधित कलम 8 (1) (ई) आणि 8 (1) (जे) या दोन कलमांचा हवाल देत ही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, एसबीआयने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर असलेली माहिती द्यायलाच नकार दिल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.





























































