
ईएमआय बाऊन्सप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) झटका बसला आहे. ग्राहकाच्या खात्यात पुरेसे पैसे असतानाही बँकेने ईएमआय बाऊन्स चार्ज लावला. ही चूक एसबीआयला भारी पडली आहे. आता ग्राहकाला 1.7 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
दिल्लीतील महिलेने 2008 साली एचडीएफसी बँकेकडून 2.6 लाख रुपयांचे कार लोन घेतले होते. ईएमआयसाठी तिने एसबीआयमधून ऑटो डेबिट (ईसीएस) केले होते. प्रत्येक महिन्याला 7,054 रुपये तिच्या ईएमआय बँक खात्यातून कट व्हायचे. अशातच तिचे 11 ईएमआय बाऊन्स झाले आणि एसबीआयने प्रत्येक वेळी तिला 400 रुपये प्रमाणे दंड लावला. जेव्हा महिलेला ईएमआय बाऊन्सची नोटीस मिळाली तेव्हा ती हैराण झाली. तिने बँक स्टेटमेंट काढले. त्यात असे दिसून आले की, प्रत्येक वेळी तिच्या खात्यात पुरेशी रक्कम असताना बँकेने ‘इनसफिशियंट बॅलन्स’ दाखवून शुल्क कापले होते. महिलेने अनेकदा बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र तिला ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे 11 वर्षे तिने कायदेशीर लढा दिला.

























































