
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल होताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वाचीच अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते या भीतीने संबंधित माजी संचालकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळेच बचावसाठी त्यांनी हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी तर आज चक्क राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा अर्ध्यावर सोडून मुंबईला धाव घेतली आहे.
राज्यातील सहकारी बँकेची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी 2005-10 या काळात मनमानी कारभार केल्याने 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत महिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने बँकेच्या तत्कालीन संचालकांवर पाच दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सुमारे 70 जणांवर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा नोंद झाल्याने आता अटकेची कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्हणे राजकीय हेतूने प्रकरण घडवून आणले
राज्य बँकेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेले नाही. हे सर्व प्रकरण केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय हेतूने घडवून आणले आहे. याची चौकशी होऊ द्या, सर्व सत्य समोर येईल असा दावा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याआधी बँकेच्या कारभाराची गुन्हे शाखेने तीन वेळा चौकशी केली होती, पण त्यामध्ये काहीही आढळले नसल्याचे त्यांच्याच अहवालावरून स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
घोटाळ्याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह घोटाळेबाज संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुह्याचा तपास करण्यासाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (एसआयटी)ची स्थापना करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या नेतृत्वाखाली ही टीम तपास करेल. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, काँग्रेस नेते मधुकर चव्हाण, जयवंतराव आवळे, दिलीप देशमुख यांच्यासह 70 हून अधिक जणांवर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुह्याचा तपासासाठी एसआयटीची स्थापना केल्याचे वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

























































