
प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देणारा आदेश जुनाच आहे अशी सारवासारव आज राज्य निवडणूक आयोगाने केली. मात्र या आदेशासंदर्भात उमेदवारांना पूर्वकल्पना का देण्यात आली नाही याबाबत मात्र आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाले.
महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराची सांगता 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाली. मात्र त्यानंतरही उमेदवारांना घरोघर जाऊन प्रचार करता येईल असे आयोगाने सांगितले. यापूर्वीच्या निवडणुकीत अशी मुभा मिळाली नसल्याने शिवसेना आणि मनसेने याबाबत आयोगाला जाब विचारला. त्यानंतर आयोगाने आज सायंकाळी स्पष्टीकरण दिले. 14 फेब्रुवारी 2012 रोजी निवडणूक आयोगाने हा आदेश जारी केला असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानेही फिरता येणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे.






























































