
इंडियन ऑईल व रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशन यांच्यावतीने उद्या 10 आणि 11 जून रोजी स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन ऑईलचे कार्पोरेट कम्युनिकेशनचे जनरल मॅनेजर सुरेश अय्यर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दि.10 जून रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. शनिवारी डुप्लीकेट स्पर्धेच्या आठ फेऱ्या होतील. त्यातील गुणानुक्रमे पहिले 6संघ सुपर लिगसाठी पात्र होतील. त्यानंतर ओपन पेअर्स हा स्पर्धा प्रकार घेण्यात येणार आहे. अविनाश चितळे या स्पर्धेचे संचालक म्हणून काम पाहणार आहेत. ब्रिज राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, पुणे, सांगली, नाशिक येथून सुमारे 30 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुरेश अय्यर यांनी दिली. यावेळी रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अभय लेले, संस्थेचे अध्यक्ष उमाकांत सनगर, इंडियन ऑईलचे एस.किशोर उपस्थित होते. यावेळी सुरेश अय्यर यांनी सांगितले की, ब्रिज हा आंतरराष्ट्रीय खेळ आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा असते. मात्र आज तरुणवर्ग ब्रिज खेळाकडे वळत नसल्याची खंत अय्यर यांनी व्यक्त केली. ब्रिजबरोबरच अन्य खेळांनाही ब्रिज असोसिएशन प्रोत्साहन देते. 10 ते 18 वयोगटातील उदयोन्मुख खेळाडूंना शिष्यवृत्ती देत असल्याची माहिती अय्यर यांनी दिली.





























































