विक्रोळीत तुफानी प्रतिसादात घुमला ‘कबड्डी कबड्डी’चा दम; शिवसेना आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेने क्रीडाशौकीन सुखावले

कोरोनाचा कहर संपल्यावर आपल्या नजरेचे पारणे फेडणारी स्पर्धा विक्रोळीच्या रवींद्र म्हात्रे क्रीडांगणातील दिवंगत सुधीरभाऊ जोशी क्रीडानगरीत अनुभवायला मिळाली. शिवसेनानेते, खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार, सुनील राऊत यांनी शिवसेना विक्रोळी विधासभा क्षेत्राच्या वतीने प्रो-कबड्डीच्या धर्तीवर भव्य राज्यस्तरीय  पुरुष, महिला, कुमार आणि व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे दृष्ट लागण्यासारखे आयोजन केले आहे. राज्यातील 45 नामवंत संघांचा आणि सुमारे 25 प्रो-कबड्डीपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

राजकीय कबड्डीही आम्हीच जिंकणार उदय सामंत

विक्रोळीतील भव्यदिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संयोजक आमदार सुनील राऊत यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, मी सुनील राऊत यांच्या उपक्रमांचे नेहमीच अनुकरण करीत तसेच कार्यक्रम रत्नागिरीतही राबवतो. त्यांनी शिवसृष्टी उभारली, मीही रत्नागिरीत तसा उपक्रम राबवला. आता ऑक्टोबरमध्ये अशीच राज्यस्तरीय कबड्डी रत्नागिरीत आयोजित करणार आहेदेशात आणि राज्यात चाललेल्या राजकीय कबड्डीचा उल्लेख करीत सामंत म्हणाले, शिवसेना कबड्डी मातीतील असो अथवा राजकारणात, त्यात खेळण्यात माहीर आहे. त्यामुळे आमच्या विरोधात कुणीही उतरो पण मुंबई महानगरपालिकेची राजकीय कबड्डी शिवसेनाच जिंकणार याची मला खात्री आहे. जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांच्या आयोजनात शिवसेनाच अग्रेसर असते याचाही उल्लेख त्यांनी केला. यावेळी सामंत यांचा आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते  शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी झटणारे माजी महापौर दत्ता दळवी आणि माजी आमदार शिशिर शिंदे, उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांचा सुनील राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.     

महोत्सवी वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात मुंबई महानगरपालिका  संघाने बँक ऑफ बडोदा संघाचा 34-25 असा 9 गुणांनी तर ठाणे महानगरपालिकेने रिझर्व्ह बँक संघाचा 34-28 असा 6 गुणांनी पराभव करीत विजयी सलामी दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर संघटनेच्या मान्यतेने आयोजित या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला संयोजक आमदार सुनील राऊत, माजी आमदार शिशिर शिंदे, माजी महापौर दत्ता दळवी, आमदार आणि शिवसेना विभागप्रमुख रमेश कोरगावकर, शिवसेना महिला विभाग संघटक संध्या वढावकर, नगरसेवक उपेंद्र सावंत, नगरसेविका सुवर्णा करंजे, राजराजेश्वरी रेडकर, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर, सरचिटणीस प्रताप शेट्टी आणि राष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक सैदल सोंडे आदी मान्यवर आणि शिवसेना पदाधिकारी व कबड्डीशौकीन मोठय़ा संख्येने उपस्थित होते.