
सामना प्रतिनिधी । शिर्डी
सौर उर्जे अंतर्गत राज्यातील शेतीला बाराही महिने १२ तास अखंडीत वीज दिली जाईल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी ड्रिप इरिगेशन साठी ८० टक्के सबसीडी देऊ. राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार असून ‘ये तो ट्रेलर है पिक्च्चर अभी बाकी है’ म्हणत शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचे असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांनी शिर्डी येथे सरपंच परीषदेत बोलताना दिले.
शिर्डी येथे राज्यस्तरीय सरपंच व उपसरपंच कार्यशाळा व परीषदेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे होत्या. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, विधान सभा उपाध्यक्ष विजय औटी, दादा भुसे, खासदार डॉ. सुजय विखे, जि. प. अध्यक्षा शालीनीताई विखे, प्रधान सचिव गुप्ता आमदार स्नेहलता कोल्हे, आ मोनीका राजळे, आ मुरकूटे, आ शिवाजी कर्डीले सरपंच परीषद अध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणविस म्हणाले, आमच्या सरकारने महत्वपूर्ण कामे केली असून शेती आणि ग्राम विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे. राज्यातील सर्व बेघर नागरीकांना २०२२ पर्यत स्व:ताचे घर देणार, प्रत्येक गावाच्या गावठाणची मोजणीचे काम शिर्डीतून आज सुरू केले. ४४ हजार गावांची दिड वर्षात ड्रोन द्वारे मोजणी करून नागरीकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी ३६० दिवस दिवसा बारा तास वीज देण्याची योजना दिड दोन वर्षात पूर्ण करू. मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत ३० हजार कि. मी. लांबीचे रस्ते पूर्ण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी सांगीतले.
सरपंच आणि ग्रामविकास विभागाने हातात हात घालून काम केल्यास गाव व पर्यायाने राज्य बदलू शकते. सरपंच हाच खरा विकासाचा शिल्पकार आहे. ग्रामविकासाकरीता राज्याची तिजोरी खुली ठेवू व ग्रामीण भागाचा विकास पूर्ण करू .सरपंचाच्या बहूमानासाठी जनतेतून सरपंचाची निवड पध्दत सुरू केली. सरपंचांचे मानधन वाढविले, उपसरपंचांना मानधन सुरू केले. जिल्हा नियोजन समितीत सरपंचाचा प्रतिनिधी असेल यासाठी निर्णय घेऊ. पुढेही आमचेच सरकार येणार आहे. त्यावेळी तुमचे सर्व प्रश्न सोडवू तसेच सरपंच पुरस्कार सुरू करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतरच्या योजना आजही लागू होत्या. त्या जुनाट योजना आमच्या सरकारने बंद करून नवीन सुरू केल्या. गावातील माणूस गावातच कसा राहील यासाठी काम केले जात आहे. पंतप्रधान मोदींचे विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आदी सर्व सुविधा गावातच उपलबध्द करून दिल्या तर माणूस शहराकडे जाणार नाही. काल सरपंचाचे मानधन वाढविण्याची घोषणा केली. आज सर्व सरपंचांच्या खात्यावर मानधन जमा केले आहे. या सर्व योजना पूर्ण करण्याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

























































