
हिंदुस्थानात उच्च शिक्षणाची उपलब्धता वाढली असली तरी पदवीधर तरुणांसाठी पुरेशा नोकऱ्या निर्माण न झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026’ या अहवालानुसार, 2023 मध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बेरोजगार होते. बेरोजगारांमध्ये 15 ते 25 वयोगटातील पदवीधरांची संख्या 40 टक्के असून 25 ते 29 वयोगटातील बेरोजगार पदवीधरांची संख्या 20 टक्के आहे. बेरोजगारांमध्ये पदवीधारकांचा वाटा 2017 मधील 46 टक्क्यांवरून 2023 मध्ये 67 टक्क्यांपर्यंत झपाट्याने वाढला आहे.
पदवीधर होणाऱ्यांची संख्या वाढल्याने मागील वर्षात पदवीधर बेरोजगारांची समस्या वाढली आली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. पदवीधर तरुणांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याचे प्रमाण 7 टक्क्यांहून कमी आहे. त्यातही व्हॉईट कॉलर जॉबचा विचार केला तर हे प्रमाण 3.7 टक्क्यांच्याही खाली आहे.
2023-2024 दरम्यान दरवर्षी सुमारे 50 लाख नवीन पदवीधर तयार झाले. मात्र रोजगार मिळालेल्या पदवीधरांची संख्या केवळ 28 लाखांनी वाढली. त्यापैकी 17 लाख जणांना वेतनधारी नोकऱ्या मिळाल्या. पदवीधरांचे प्रमाण आणि त्यातुलनेत रोजगार निर्मिती यामध्ये मोठी तफावत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण सोडण्याचे सामान्य कारण अनेकदा दिले जाते. 2017 मध्ये या कारणाने शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण 58 टक्के होते, ते 2023 पर्यंत वाढून 72 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे अहवालातून स्पष्ट होते.
शिक्षण घेणाऱ्या तरुण पुरुषांचे प्रमाण 2017 मधील 38 टक्क्यांवरून 2024 च्या अखेर 34 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.





























































