
राज्य सरकारने जाहीर केलेल्या भरघोस पगारवाढीनंतर एसटीचे कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सकाळपासून कोल्हापूर आगाराच्या 20 फेऱ्य़ा झाल्या, तर शेवगाव आगारातून शंभर टक्के बसेस सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूर आगारातून एसटीच्या एकूण 20 फेऱ्य़ा झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. आगारातील 58 कर्मचाऱ्य़ांच्या निलंबनाची कारवाई रद्द केल्याचे पत्र व्यवस्थापक रोहन पलंगे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. तसेच एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी, असे आवाहन केले. त्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचारी संप मागे घेत असल्याची माहिती आंदोलकांकडून देण्यात आली.
नगर जिल्ह्यातील शेवगाव बस आगारातील कर्मचारी आणि एसटी आगारप्रमुख यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्य़ांनी आपलं ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले असून, शेवगाव आगारातून बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. सर्वात पहिली बस शेवगाव आगारातून नगरच्या दिशेने रवाना झाली आहे. त्याचबरोबर पैठण, गेवराई, श्रीरामपूर या ठिकाणी बस रवाना झाल्या असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे दिलीप लबडे यांनी दिली आहे.
शेवगाव आगारातील काही कर्मचाऱ्य़ांना निलंबित करण्यात आले होते. या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात आले असून, ते सेवेत हजर झाले आहे. जिल्ह्यातील 300 कर्मचाऱ्य़ांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढले जाणार असल्याची माहिती होती. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्य़ांना समजावून सांगितल्यानंतर ते कामावर हजर होण्यास तयार झाल्याचे लबडे यांनी सांगितले. आमच्या मागण्या रास्त आहेत. मात्र, प्रवाशांची होणारी अडचण, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवावी म्हणून आम्ही दोन पावले मागे घेत एसटी आगारातून बस सुरू करत असल्याचे कर्मचाऱ्य़ांचे म्हणणे आहे.
बसस्थानकांवर प्रवाशांची वर्दळ वाढली
सोलापूर आगारातून शुक्रवारी ग्रामीण भागात एसटी बसेस सोडण्यात आल्या. वाहक व चालक कामावर परतू लागल्याने रस्त्यावर पुन्हा लालपरी धावू लागल्याचे चित्र दिसत होते. सोलापूर आगारातील संपावर गेलेले काही वाहक व चालक शुक्रवारी कामावर परतले आहेत. या वाहकचालकांनी प्रवाशांकरिता ग्रामीण भागात सेवा सुरू केली आहे. आज सोलापूर आगारातून दुपारी साडेबारापासून मंद्रुप, मोहोळ, नळदुर्ग, वैराग आदी मार्गांवर सुरक्षितरीत्या एसटी बसेस सोडण्यात आल्या यामुळे बसस्थानकांवरही प्रवाशांची वर्दळ वाढली होती. संपादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्य़ांना कामावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


























































