
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा लवकरच कायापालट होणार आहे. आदिवासी विभागामार्फत आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा चांगल्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कायापालट हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानामुळे तुटलेले बाक, निकृष्ट दर्जाची आसनव्यवस्था यांसारख्या तक्रारी आता संपुष्टात येणार असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य आदिवासी विकास विभागातर्फे पुरविले जाणार आहे.
राज्यातील आश्रमशाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदी शासनाच्या जेम या संकेतस्थळावर होणार आहे. या मोहिमेअंतर्गत आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या पुढाकाराने 502 शासकीय आश्रमशाळा आणि 491 वसतिगृहांचे बदलेले सकारात्मक रूप पाहता येणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी 215 कोटी 57 लाख एवढा प्राप्त दर ठरवला आहे.
जेम संकेतस्थळ खरेदी प्रक्रिया
जेमवर खरेदी करावयाच्या साहित्याचा तपशील देण्यात येतो. नमूद कालावधीत उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाच्या दर्जा विषयी माहिती देण्याची व्यवस्था आहे.
- सरकारकडून संबंधित उत्पादकांच्या साहित्याचा दर्जा तपासण्यात आल्यावर खरेदी व्यवहारासाठी बोलावले जाते.
- या ऑनलाइन खरेदी प्रक्रियेमुळे उत्तम उत्पादने योग्य दरात खरेदी करण्यास सहाय्य होईल.


























































