दहा राज्यांमधील बेरोजगारी शिखरावर, उत्तराखंड, हरियाणात सर्वाधिक बेकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील एकूण बेरोजगारीचा दर कमी झाल्यानंतरही दहा राज्यांमध्ये बेकारांची संख्या वाढत आहे. त्यात उत्तराखंड आणि हरियाणा ही राज्ये आघाडीवर आहेत. उत्तराखंडमध्ये बेरोजगारीचा दर 22.3 टक्के तर हरियाणामध्ये 19.7 टक्के आहे. तेथील तरुणवर्ग नोकरीसाठी वणवण करत आहे. बेरोजगारी शिखरावर पोहोचली आहे.

ग्रामीण भागांपेक्षा शहरांमध्ये बेरोजगारी अधिक

सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांमध्ये बेरोजगारी जास्त होती. शहरी भागांतील बेरोजगारीचा दर 8.45 टक्के तर ग्रामीण भागांतील 5.86 टक्के इतका होता. त्याच कालावधीत राष्ट्रीय बेरोजगारी दर 6.67 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने ही आकडेवारी दिली आहे. त्यानुसार उद्योगधंदे मोठय़ा प्रमाणात असूनही हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमधील बेरोजगारी वाढली आहे. त्रिपुरात बेरोजगारीचा दर 17.4 टक्के, जम्मू-कश्मीर 16.2 टक्के, गोवा 15.4 टक्के, राजस्थान 14.3 टक्के, दिल्ली 12.5 टक्के, हिमाचल प्रदेश 12 टक्के, बिहार 11.9 टक्के, पुडुचेरी 10.9 टक्के असा डबल डिजिटमध्ये आहे.

13 राज्यांमध्ये बेरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त

सप्टेंबर महिन्यात देशातील 13 राज्यांमध्ये देशातील एकूण सरासरीपेक्षा जास्त बेरोजगारी दर होता. वर उल्लेख केलेल्या राज्यांबरोबरच पश्चिम बंगालमध्ये 9.3 टक्के, पंजाब 9.6 टक्के तर झारखंडमध्ये 8.2 टक्के इतका बेरोजगारी दर राहिला.

चार राज्यांमध्ये 3 टक्क्यांपेक्षा कमी बेरोजगारी दर

आसाम, छत्तीसगढ, ओडिशा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये बेरोजगारीचा दर 3 टक्क्यांपेक्षाही कमी राहिला. तेलंगाना, गुजरात, मध्य प्रदेश, मेघालय, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 ते 5 टक्के बेरोजगारी दर राहिला.

बेरोजगारीची कारणे

  • शेतीचा मोसम असल्याकारणाने सीझनल नोकऱ्या कमी
  • रोजगार हमी योजनेत नोकऱ्यांची संख्या कमी
  • कोरोनामुळे उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू न होणे