
सामना प्रतिनिधी । वाडा
फुले आणि फळांच्या उत्पन्नासाठी पालघर जिह्यातील हवामान अनुकूल असतानाही येथील शेतकरी भाताचीच लागवड करतात. मात्र यापुढे पालघरात सामूहिक शेती केली जाणार असून ठिकठिकाणची शिवारे फुलांनी बहरणार आहेत. राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाने यासाठी महिला बचत गटांना आवाहन केले आहे. या सामूहिक शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाला मुंबईत हक्काची बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्योती ठाकरे यांची निवड झाल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार व महिला मेळाव्याचे आयोजन पी. जे. हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी महिला बचत गटांना सामूहिक शेतीकडे वळतानाच फूलशेतीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. स्वयंसिद्धच्या संस्थापिका कांचनताई परुळेकर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, उमेद संस्थेच्या लेखाधिकारी तनुजा राणे, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माणिक दिवे, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, उपनगराध्यक्ष उर्मिला पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका सुनीता दिनकर, वैष्णवी रहाणे, नीता पाटील, भारती पिंपळे आदी उपस्थित होते.
आर्थिक सहाय्यासाठी बँकांशी चर्चा
जिह्यात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या कडधान्यासाठी ‘डाळ मिल’ उभारण्याचा प्रयत्न आहे. दोन महिन्यांत महिला बचत गटांनी तयार केलेल्या 200 उत्पादनांना ऍमेझॉनमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचेही ज्योती ठाकरे यांनी सांगितले. महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी विविध बँकांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

























































