
महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेला जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीने उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून, या आंदोलनात शिवसेनेचा सक्रिय सहभाग असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
जनसुरक्षा कायद्याविरुद्ध उद्या राज्यभरात आंदोलनाचा वणवा पाहायला मिळणार आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उल्का महाजन यांच्या उपस्थितीत सभा झाली होती. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातील आंदोलनात शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यामुळे उद्याच्या आंदोलनात शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहे. राज्यात प्रत्येक जिल्हा पातळीवर पुकारण्यात येणाऱया आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी दिली.
कोणते पक्ष सहभागी होणार…
जनसुरक्षा कायद्याविरोधातील आंदोलनात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, भाकपा, शेकाप हे पक्ष सहभागी होणार आहेत.
2 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन
जनसुरक्षा विधेयक हे हुकूमशाही पद्धतीचे असून सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भीती आहे. नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत. त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही. पण सरकार अदानीसारख्या भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांच्याविरोधात कोणीही आंदोलन करू नये, आवाज उठवू नये यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो. या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून, उद्याचे आंदोलन झाल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली.
शिवाजी पार्क येथे होणार निदर्शने
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील पुतळ्याजवळ उद्या दुपारी साडेतीन वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात शिवसैनिक, संघर्ष समिती आणि अन्य पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.