
सामना प्रतिनिधी । ठाणे
काही जणांनी गावठाण तसेच कोळीवाडय़ांमध्ये राहणाऱया लोकांच्या मनात क्लस्टरबाबत संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली असून हा संभ्रम दूर होईपर्यंत गावठाण व कोळीवाडय़ामधील क्लस्टरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसे आदेशच शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शिवसेना भूमिपुत्रांच्या पाठीशी राहणार असून ठाण्याच्या शहरी भागात क्लस्टर योजनेचा नारळ लवकरच फुटणार आहे. त्यामुळे वागळे इस्टेट, कोपरी, वर्तकनगर, लोकमान्यनगर, राबोडी या भागातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास होणार असून रहिवाशांना हक्काचे घर मिळेल.
ठाणे महापालिका क्षेत्रात ३ हजार ६९३ एवढय़ा धोकादायक इमारती असून अनेक वर्षांपासून त्यात राहणाऱया नागरिकांवर टांगती तलवार होती. क्लस्टर योजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी शिवसेनेने तब्बल १५ वर्षे संघर्ष केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर भव्य मोर्चाही काढला. मोठय़ा लढय़ानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने क्लस्टर योजनेची अंतिम अधिसूचना काढली. त्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱयांना ३०० चौरस फुटांचे घर मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व अडचणी दूर झाल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने क्लस्टर योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या असतानाच गावठाण व कोळीवाडा क्षेत्रात क्लस्टरला अनेकांनी विरोध केला. आतापर्यंत सुमारे ८५ हजार हरकती व आक्षेप घेण्यात आले.
गावठाण व कोळीवाडय़ांमधील घरे ५० हून अधिक वर्षांची असून पुनर्विकासाबाबत त्यांच्यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. तसेच त्यांना गावठाण, कोळीवाडा क्षेत्रात तूर्त तरी क्लस्टर राबवू नये असे निर्देश दिले. या ठिकाणी क्लस्टरचे १३ प्रस्ताव होते. हा भाग वगळून शहरातील वागळे इस्टेट, कोपरी, लोकमान्यनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, वर्तकनगर, राबोडी येथील अतिधोकादायक इमारतींचा लवकरात लवकर पुनर्विकास करणार असून ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत क्लस्टरचा शुभारंभ होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वतंत्र ओळख जपणार
ठाण्यातील गावठाण तसेच कोळीवाडे म्हणजे शहराचे वैभव असून त्यांची संस्कृती व स्वतंत्र ओळख जपायलाच हवी. सध्या तिथे क्लस्टरला स्थगिती दिली असली तरी तेथील ग्रामस्थांच्या मनातील सर्व प्रश्न तसेच संभ्रम दूर करणार असून शिवसेना कायमच भूमिपुत्रांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र तेथील विकासही तेवढाच महत्त्वाचा असून शहरातील क्लस्टर सुरू झाल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



























































