सावत्र मुलालाही अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याचा अधिकार, उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी कर्मचाऱ्याच्या सावत्र मुलालाही अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा अधिकार असल्याचं स्पष्टीकरण कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलं आहे. उच्च न्यायालयासमोर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे स्पष्टीकरण केलं आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती देबांगशु बसाक आणि न्यायमूर्ती मोहम्मद शब्बर रशीदी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकाकर्ता हा कर्मचाऱ्याचा सावत्र मुलगा आहे. त्यांची आई बीना कर यांनी 1981मध्ये त्याला जन्म दिला होता. त्यावेळी बीना या गणेशचंद्र साहा यांच्या पत्नी होत्या. साहा यांच्या 1989मध्ये झालेल्या मृत्युनंतर बीना यांनी भोलानाथ यांच्याशी विवाह केला. भोलानाथ हे सरकारी नोकरीत शिपाई पदावर होते.

2003मध्ये भोलानथा यांच्या मृत्युनंतर याचिकाकर्त्याने आपल्या सावत्र पित्याच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज दिला. मात्र, भोलानाथ यांनी याचिकाकर्त्याला औपचारिक पद्धतीने दत्तक न घेतल्याने त्याला नोकरी मिळाली नाही. याविरोधात त्याने याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना खंडपीठ म्हणालं की, मुलाचा अर्थ केवळ जैविक मुलगा असा होत नाही. मुलगा हा मुलगा असतो. त्यामुळे मुलगा किंवा पुत्र या व्याख्येत सावत्र मुलगा किंवा अनौरस मुलगा हा शब्द तितकाच सहभागी होईल, जितका जैविक पुत्र हा आहे. तसंच, संविधानाच्या कलम 16 (2) चं हे उल्लंघनही ठरेल, असं स्पष्ट करत सावत्र मुलगाही नोकरीच्या अनुकंपा तत्वासाठी पात्र असल्याचं स्पष्ट केलं आहे.