तामीळनाडूतील ‘स्टरलाइट’ला अखेर टाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

कोकणात विनाशकारी ‘नाणार प्रकल्प’ आणण्याचा निर्धारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेला असतानाच तुतिकोरिन येथील वेदांत ग्रुपचा प्रदूषणकारी स्टरलाइट कॉपर प्लान्ट कायमचा बंद करण्यात येईल, अशी निःसंदिग्ध  घोषणा तामीळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी केली.

तुतिकोरीन येथे ‘वेंदात ग्रुप’ ही कंपनी आणखी एक मोठा स्टरलाइट कॉपर प्लाण्ट’ उभारणार आहे. त्या प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळताच तिथे आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्या आंदोलनावर पोलिसांनी २२ मे रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात १३ जणांचा बळी गेला होता. तर ४७ जण जखमी झाले होते.

तामीळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी कॉपर प्लाण्टविरोधी आंदोलनात जखमी झालेल्यांची सरकारी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. जखमींना आपल्या सरकारने भरपाईची रक्कम याआधीच दिलेली आहे, असे पनीरसेल्वम यांनी सांगितले.

स्टरलाइट कॉपर प्लाण्ट बंद करावा, हीच स्थानिक जनतेची मुख्य मागणी आहे. सध्या तरी तो प्लाण्ट बंदच आहेच. पण तो प्लाण्ट कायमचा बंद करून टाकण्यात येईल. त्या दृष्टीने आमचे ‘अम्मा सरकार’ आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या भेटीनंतर दिली.

– तुतिकोरिन येथे १९९८ पासून  कॉपर कंपनी सुरू आहे. तिथे धातू वितळवण्याचे काम केले जात असून एक वर्षात लाख टन तांब्याच्या तारेचे उत्पादन केले जाते.

– त्या कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक जनतेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने गेली अनेक वर्षे त्या कंपनीविरोधात आंदोलने होत आली आहेत.

‘वेदांत ग्रुपचा प्रदूषणकारी स्टरलाइट कॉपर प्लाण्ट २०१३ सालात दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी बंद केला होता.

– ओ. पनीरसेल्वम, उपमुख्यमंत्री, तामीळनाडू

प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात संताप

स्टरलाइट कॉपर कंपनीविरोधातील आंदोलनात तामिळी जनतेचा सर्वात अधिक राग राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर होता. या मंडळाने नियम धाब्यावर बसवून कंपनीवर मेहेरबानी दाखवत जनतेशी विश्वासघात केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. कॉपर कंपनीशी स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱयांचे संगनमत असल्यामुळेच आंदोलन करणाऱयांवर पाशवी बळाचा वापर होत असल्याचा आरोपही आंदोलक करत आहेत.