
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ क्रिकेट संघांमधील मालिकेला सुरुवात होण्याआधी माइंडगेमला सुरुवात होत असते. अपेक्षेप्रमाणे यंदाही हा माइंडगेम सुरू झाला असून ऑस्ट्रेलियाचे ‘रनमशीन’ असलेल्या स्टीव्ह स्मिथने हिंदुस्थानी गोलंदाजांना आव्हान दिले आहे. तुमच्या शॉर्ट पिच गोलंदाजीची आम्हाला आजिबात चिंता नाही, आम्ही त्यासाठी सज्ज आहोत असा माइंडगेम यावेळी स्मिथने खेळलाय.
स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘आयपीएल’च्या निमित्ताने हिंदुस्थानच्या बहुतांश गोलंदाजांचा मी सामना केलेला आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या शॉर्ट पिच गोलंदाजीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. शिवाय अशा प्रकारची गोलंदाजी माझ्यासाठी नवीन नाही. आम्ही ‘टीम इंडिया’च्या शॉर्ट पिच गोलंदाजीचा सामना करण्यासाठी उत्सुक आहोत, असा इशाराही स्मिथने दिला आहे.
इतिहास आहे साक्षीला
‘टीम इंडिया’च्या शॉर्ट पिच गोलंदाजीला मी घाबरत नाही असे स्टिव्ह कितीही म्हणत असला तरी अशा प्रकारच्या गोलंदाजीविरुद्ध त्याची कामगिरी खराब राहिलेली आहे, असे इतिहास सांगतो. 2019-20 मध्ये न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरच्या शॉर्ट पिच गोलंदाजीपुढे स्मिथची भंबेरी उडाली होती. वॅगनरने त्याला चार वेळा बाद केलेले आहे. नीलच्या गोलंदाजीचे स्वतः स्मिथनेही कौतुक केले होते, मात्र इतर गोलंदाज नीलची पुनरावृत्ती करू शकणार नाहीत असेही स्मिथ म्हणाला.
तिखट गोलंदाजी
हिंदुस्थानकडे जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी अशी तुफानी वेगवाग जोडगोळी आहे. अनुभवी इशांत शर्मा फिट झाला तर त्याला कसोटी मालिकेसाठी पाचारण केले जाऊ शकते. शिवाय उमेश यादव व नव्या दमाचा नवदीप सैनी असा तिखट माऱयाचा भन्नाट गोलंदाजी ताफा हिंदुस्थानच्या दिमतीला आहे. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्धची द्विपक्षीय मालिका यजमान ऑस्ट्रेलियासाठी नक्कीच सोपी नसेल. उभय संघांमध्ये मागील वेळी झालेल्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ नव्हता. चेंडू पुरतडण्याच्या प्रकरणामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी होती. त्यामुळे यावेळी स्मिथ हिंदुस्थानी गोलंदाजीला कसा सामोरा जातो याकडे सर्वांच्या नजरा असतील.





























































