
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात तणाव असताना आता हिंदुस्थानच्या शेअर बाजारात थोडी तेजी दिसत आहे. हिंदस्थानने आता अमेरिकेच्या टॅरिफचा मुकाबला करण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता रशिया आणि चीनसोबत देशाचे संबंध सुधारत असल्याने शेअर बाजारात याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे बाजारात तेजी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही तेजीचा ट्रेंड सुरूच आहे आणि सोमवारप्रमाणे मंगळवारीही सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये उघडले. मंगळवारी रिलायन्ससह अनेक शेअरमध्ये तेजी दिसून आली. संमिश्र जागतिक संकेत मिळत असतानाही सेन्सेक्स-निफ्टी मंगळवारी ग्रीन झोनमध्ये उघडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८०५०० च्या वर सुरू झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही मागील बंदच्या तुलनेत तेजीत दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर बऱ्याच काळापासून मंदावले होते, त्यातही सुरुवातीसह जोरदार वाढ दिसून आली.
सेन्सेक्स ८०,५२०.०९ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८०,३६४.४९ च्या तुलनेत काही मिनिटांतच ८०५७.९४ वर व्यवहार करताना दिसला. यासोबतच, एनएसईचा निफ्टी २४,६२५.०५ च्या मागील बंदच्या तुलनेत किंचित वाढीसह २४,६५३ वर उघडला आणि त्यानंतर तो वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आणि २४,६८५.८५ वर व्यवहार सुरू केला. लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इटरनल शेअर्स (१.७४%), एनटीपीसी शेअर्स (१.३६%), पॉवर ग्रिड शेअर्स (१.३५%), एचयूएल शेअर्स (१.२०%) च्या वाढीसह व्यवहार होताना दिसून आले.