Stock Market Today – आठवड्याची सुरुवात सकारात्मक; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तुफान तेजी, 10 शेअर बनले रॉकेट

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 500 अकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 26,100 च्या पार पोहोचला. जागतिक बाजारातून मिळणाऱ्या चांगल्या संकेतामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.

अमेरिकेसह जपान, कोरिया आणि हॉन्गकॉन्गच्या बाजारपेठांमध्ये तेजी असून याचा सकारात्मक परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही दिसून आला. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स 450 अकांनी, तर निफ्टी 150 हून अधिक अकांनी वधारला.

गेल्या सत्रामध्ये सेन्सेक्स 84,929.36 वर बंद झाला होता. तो सोमवारी 85,000 पार उघडला. काही मिनिटातच सेन्सेक्सने 500 अंकांची झेप घेतली आणि तो 85,406 वर पोहोचला. निफ्टीनेही दमदार वाटचाल कायम ठेवत 26 हजारांचा टप्पा ओलांडला. गेल्या सत्राच्या तुलनेत निफ्टीमध्ये 150 अकांची वाढ दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

कोणते शेअर बनले रॉकेट?

शेअर बाजारातील तेजीचा फायदा आयटी सेक्टरमधील शेअरसह अनेक लार्ज कॅप कंपन्यांनाही झाला. लार्ज कॅपमध्ये Infosys कंपनीचा शेअर 2.20 टक्के, टाटा स्टीलचा शेअर 1.50 टक्के, Tech Mahindra चा शेअर 1.20 टक्के, मिड कॅपमध्ये GVTD चा शेअर 10 टक्के, KEI चा शेअर 5 टक्के, SAIL चा शेअर 3.50 टक्के, Ashok Leyland चा शे्र 2 टक्के, स्मॉल कॅपमध्ये Spectrum चा शेअर 12 टक्के, QuadFuture चा शेअर 11.25 टक्के आणि JWL चा शेअर 10 टक्क्यांनी वाढला.

तेजीचे कारण

– 14 सत्रांमध्ये विक्री केल्यानंतर एफआयआयने पुन्हा एकदा खरेदी सुरू केली. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 1,830.89 कोटींची खरेदी केली. तर गेल्या तीन सत्रात एफआयआयने 3,776 कोटींची खरेदी केली.

– 2026 मध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजात दोन वेळा कपात केली जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

– दक्षिण कोरिया, जपान, शांघाय आणि हॉन्गकॉन्गच्या बाजारात तेजी दिसून आली. अमेरिकन मार्केटमध्येही तेजी असल्याने याचा सकारात्मक परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर झाले.

– डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 22 पैशांनी वधारून 89.45 वर पोहोचला.

– आयटीच्या शेअरमध्ये तुफान खरेदी होत आहे. आयटी सेक्टरमध्ये क्वार्टरली 1.2 वाढ नोंदवण्यात आली आहे.