एसी लोकलवर दगडांचा मारा… मध्य रेल्वेच्या एकाच लोकलच्या तीन डब्यांच्या काचांना तडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा भार वाहणाऱया लाइफ लाइन लोकलची उच्चभ्रू आवृत्ती असलेल्या गारेगार एसी लोकलचा फटका साध्या फेऱयांना बसत आहे. त्यामुळे एसी लोकल फलाटावर उगाच दरवाजांची उघडझाप करीत निवांतपणे रिकामी निघत असल्याने साध्या लोकलची वाट पाहणाऱया मुंबईकरांच्या रागाचा पारा वाढत आहे. त्यातच मध्य रेल्वेच्या एकाच एसी लोकलच्या तीन काचांवर दगडांचा मारा झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

एसी लोकलचे भाडे काही केल्या कमी होत नसताना मध्य रेल्वेच्या एकाच एसी लोकलच्या तीन काचांवर दगड मारून त्यांना तडे गेल्याची घटना घडली आहे. एसी लोकल क्र. 7054 या गाडीच्या तीन काचांवर दगड मारल्याने गेलेले तडे स्पष्ट दिसत आहेत. एका खिडकीच्या काचेला पडलेल्या तडय़ांना तर अगदी ‘सेलोटेप’ लावण्यात आली आहे. लोकलवर दगड मारणारे पकडले जावेत यासाठी रेल्वेमार्गात संवेदनशील भागात सीसीटीव्ही बसविण्याची योजना होती. लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये व डब्यासमोर सीसीटीव्ही बसविण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

भाडे कमी करण्याचा मुहूर्त कधी…

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करतानाच 36 नव्या लोकल फेऱयांची भेट दिली गेली आहे. मात्र त्यामुळे मध्य रेल्वेवर 34 नवीन आणि आधीच्या फेऱया जमेस धरून एकूण 60 एसी लोकल फेऱया चालविण्यात येत आहेत. मात्र या सर्व फेऱया टीसी व आरपीएफच्या पथकांना घेऊन रिकाम्याच धावत आहेत. एसी लोकलचे भाडे फर्स्ट क्लासच्या भाडय़ाच्या 1.3 पट जादा असल्याने ते कमी करण्याचे सूतोवाच त्याच कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांनी केले आहे. निदान फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना तरी एसी लोकलमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

हार्बरची लोकल आहे ती…

यासंदर्भात मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण बाहेरगावी असल्याचे सांगत आपल्या सहाय्यक अधिकाऱयाशी बोला असे सांगितले. सहाय्यक अधिकाऱयाचे नाव विचारता त्यांनी आपल्याला फोन करायला सांगतो असे सांगत बोलण्यास नकारच दिला. मात्र ही एसी लोकल ट्रान्स हार्बरवर चालवली जात होती त्यावेळी तिला अजिबात प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावेळी तिच्यावर दगड मारण्यात आले होते असे अन्य एका अधिकाऱयाने सांगितले.